Monday, 25 February 2013

स्वातंत्र्यवीर सावरकर-एक उपेक्षित तारा

सावरकरांना बालपणापासून योगसाधनेची आवड होती.योगसाधनेमुळे ते तुरूंगात असतानासुध्दा सगळे त्रास,हाल सोसून तेजस्वी दिसायचे.अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेच्या काळात बारी हा ब्रिटीश अधिकारी होता.हा क्रुर बारी कैद्यांचेअतोनात हाल करायचा पण सावरकरांपुढे त्याला कधी विजय मिळविता आला नाही.त्याच्या तेजापुढे ते हतबल होत. सावरकरांबददल जेव्हा बारीच्या १६ वर्षीय मुलीला कळले तेव्हा तिला त्यांना भेटावेसे वाटले.सावरकरांना भेटायला ती तुरूंगात गेली होती तो प्रसंग तिने स्वत:च कथन केला तो असा,’आम्ही अरूंद वाटेने पुढे जाऊ लागलो.दोन्ही बाजूंच्या कोठड्यामध्ये काळ्या पाण्याचे कैदी होते.माणसं कसली,ती लिंगपिसाट जनावरेच होती.त्यांनी कित्येक वर्षे स्त्री पाहिली नव्हती.कोठडीतून हात लांब करत ते मला स्पर्श करण्यासाठी आसुसलेले होते.त्यांना चुकवून मी बॅरिस्टर सावरकरांना जेथे ठेवले होते त्या कोठढीपाशी गेले.माझ्याबरोबर असलेला अधिकारी काठी आपटून लक्ष वेधणार एवढ्यात मी त्याला थांबविले.सावरकर जमिनीवर भारतीय पध्दतीने मांडी घालून(हि क्रोस्ड हिज लेग इन इंडियन स्टायल) थंड वाऱ्यात उघडेच बसले होते.ते बहुधा ध्यान(मेडीटेशन) करीत असावेत.अशा या तेजःपुंज माणसाकडे आणि माझ्या शरीरातून जणू चैतन्याची वीज सरकली. ’ही आठवण आहे क्रुर बारीच्या मुलीची. सुर्याला ग्रहण लागले असे आपण म्हणतो पण तसं आपल्याला दिसणं हे आपल्या नजरेचा दोष असतो.खरेतर सुर्याला कधीच ग्रहण लागत नसतं.सावरकरांचे जीवनही असेच होते-तेजस्वी व चारित्र्यसंपन्न.त्यांच्यावर आरोप होत राहिले आणि मोठ्या मनाने ते सर्व ग्रहण करीत गेले.भारत स्वातंत्र्य होऊनसुध्दा या महान नेत्याला नजरकैदेत ठेवले गेले हा त्यांचा अपमान नसून आम्हा भारतीयांचा अपमान आहे.सावरकर हे दिपस्तंभाप्रमाणे होते.त्यांची खरी योग्यता अहंपणाच्या आणि मुर्खपणाच्या अंधारात संसार थाटणाऱ्या काजव्यांना काय कळणार. जेष्ठ पत्रकार आणि लेखक श्री अरविंद वि.कुळकर्णी यांनी सावरकरांची तुलना पुंढलिकांशी करताना म्हटले आहे कि पुंढलिकांनी जशी पाडुरंगांची सेवा केली तशीच भारतमातेची सेवा करून देवालाही विठेवर तिष्ठत उभे ठेवावे ही सावरकरांची देशभक्ती.तुजवीण जनन ते मरण,तुजसाठी मरण ते जनन..देशासाठी आमचा निर्वंश झाला तरी चालेल...या शब्दांनीच त्यांचं देशाप्रती असलेलं प्रेम प्रकट होतं. सावरकरांचे क्रांतीचे तत्वज्ञान,इंग्रजी साम्राजाविरूध्द त्यांनी दाखविलेला धिरोधात्तपणा,मार्सेलिसच्या उडीने साऱ्या युरोपमध्ये उडालेली खळबळ,अंदमानात रक्त सांडून त्यांनी बांधलेले देशभक्तीचे महान्मंग मंदिर,त्यांची विज्ञाननिष्ठा,जातिभेद व अस्प्रुशता यांच्या निर्मुलनासाठी त्यांनी केलेला आटोकाट प्रयत्न,अखंड भारतासाठी त्यांनी केलेला झंझावात,संविधानाला स्विकारावी लागली ती त्यांनी केलेली हिन्दू या शब्दाची नेमकी व्याख्या,त्यांनी दिलेला आशावाद व स्वप्ने.पण आज या सावरकर नावाच्या अध्यायाचा कोठे उल्लेखही होताना दिसत नाही,ना पाठ्य-पुस्तकातून,ना सरकारी दरबारातून अन् ना कुठल्या माहीतीपटातून वा पत्रकातून.भ्रष्ट आणि भेसळीचे जीवन जगणाऱ्यांना सावरकर अडचणीचे वाटतात.पण सावरकर मुळातच खणखणीत नाणे असल्याने त्यांना पुर्णता वगळणे सोपे नाही. वीर सावरकर एखाद्या योग्यासारखेच जगले.संसार थाटूनही ते वैरागीच होते.एखादा वृक्ष जसा दुसऱ्यांसाठी जगतो तसे ते झटले,जगले.पण जेव्हा त्यांना वाटले की आपले कार्य आता संपत आले तेव्हा त्यांनी योग्यासारखी समाधी घेतली आणि २६ फेब्रुवारी यादिवशी आपले अवतारकार्य संपवून वैकुंठवासी झाले.एकूणच सुसंस्कृत व्यक्तिमत्व आणि रांगडा शाहिर,अस्खलित वक्ता आणि सुक्ष्म नट.अर्पोणोत्सुक क्रांतिकारक आणि दिर्घायुष्यी झालेला चिवट राष्ट्रवादी नेता आणि बुध्दिवादी विचारवंत,कर्मशुर सुधारक आणि झुंझार पण धुर्त प्रचारक अशा या एकात शरीरातील विविध पैलूच्या महापुरूषाला कोटी कोटी प्रणाम.

No comments:

Post a Comment